अन् बोलता बोलता तरूणाला लावला पावणे चार लाखाचा ऑनलाईन चुना !

जळगाव प्रतिनिधी । फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून आर्मीतील शिपायाला ३ लाख ७६ हजार रुपयांचा ऑनलाईन चुना लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी सायबर पोलीस ठाण्‍यात अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कार्तिक दिलीप पाटील हे दोन वर्षांपासून आर्मीत शिपाई या पदावर आहेत. ते सध्‍या भुसावळात वास्तव्यास आहे. मित्र गणेश पाटील याने त्यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. एक महिन्यापूर्वी त्याने उसनवारीचे दहा हजार रूपये कार्तिक यांना फोना पे द्वारे पाठविले. मात्र, पैसे खात्यात न आल्यामुळे कार्तिक यांनी फोन पे कस्टमर केअरला संपर्क साधला. काही न समझल्यामुळे त्यांनी केअरमधील वरिष्ठांचा मोबाईल क्रमांक मागितला. क्रमांक मिळताच त्यांनी त्यावर संपर्क केला. त्यावर फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून पैसे परत मिळविण्यासाठी एनीडेस्क ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितले. नंतर ॲपवरचे कोड सांगण्यास सांगितले. कोड सांगताच, कार्तिक यांना बँक खात्यातून ६० हजार काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर पुन्हा ३ लाख १६ हजार ९९४ रूपये बँकेतून काढल्याचा संदेश मिळाला. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे कळताच, त्यांनी जे ॲप डाउलोड केले होते. ते बंद केले. अखेर गुरूवारी त्यांनी जळगावातील सायबर पोलीस ठाण्‍यात धाव घेवून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर याप्रकरणी कार्तिक पाटील यांच्या फिर्यादीवरून तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Protected Content