गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ अपघात ; डंपर चालकाविरोधात गुन्हा

 

जळगाव : प्रतिनिधी ।  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला होता . अज्ञात  डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

 

भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेल्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विनोद चौधरी ( ४० ,  रा कुंभारखेडा ता. रावेर ) हे जागीच ठार झाल्याची घटना तीन एप्रिल रोजी सायंकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडली होती.  या अपघातप्रकरणी रविवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

जळगाव शहरातील पांजरापोळ येथे राहणाऱ्या मावसभावाला  भेटण्यासाठी विनोद चौधरी हे शनिवारी त्यांच्या दुचाकीने  (एम.एच.१९ डी एन.१४६२ )  आले होते. मावस भावांची भेट तसेच इतर कामे आटोपून दुचाकीने पुन्हा गावाकडे परतत असताना गोदावरी महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात डंपरने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने विनोद चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर याच अपघातात इतर दुसऱ्या दुचाकीवरील चालक वासुदेव सोनार ( ४० रा वाघनगर) हे जखमी झाले होते. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

 

एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. यात वाळूच्या डम्परने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याचे समोर आले होते.  या अपघात प्रकरणी   रविवारी रात्री विष्णू  पाटील ( २९ रा मन्यारखेडा ता. जळगाव ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी   करीत आहेत

Protected Content