गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पदावर गंडांतर ?

 

मुंबई प्रतिनिधी । एनआयएच्या तपासातून एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत असतांना आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एनआयएने एपीआय सचिन वाझे यांच्या भोवती चौकशीचा फास आवळला असतांना गृह मंत्रालयाने त्यांना निलंबीत केले आहे. तर या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला असून याबाबत उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली. यासोबत मंत्रीमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबतही याप्रसंगी चर्चा झाली. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता त्यांना राजीनामा द्यावा लागणार की त्यांना तूर्तास अभय मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Protected Content