विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगरूपदी प्रा.पवार तर प्रभारी कुलसचिवपदी प्रा. चौधरी यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा.बी.व्ही.पवार यांची तर प्रभारी कुलसचिव म्हणून प्रा.ए.बी.चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनी आज सोमवार १५ मार्च रोजी दुपारी आपला पदभार स्वीकारला. 

प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी ही नियुक्ती केली आहे. प्रा.बी.व्ही.पवार हे १८ नोव्हेंबर, २०१९ पासून प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत होते. सोमवारी त्यांची प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ३२ वर्षांपासून त्यांचा अध्यापन व संशोधन क्षेत्रात अनुभव आहे. त्यांचे १९७ संशोधन पेपर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिध्द झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे. तर नऊ विद्यार्थी सद्या संशोधन करीत आहेत. विविध संशोधन प्रकल्प त्यांनी पुर्ण केलेले असून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर (अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, संशोधन समिती) त्यांनी काम केलेले आहे. इतर विद्यापीठांच्या विविध समित्यांवर देखील प्रा.पवार यांनी काम केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्वायत्त समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. शैक्षणिक आणि प्रशासन यावर प्रा.पवार यांची अचूक पकड आहे. सोमवारी प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. 

प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्त झालेले प्रा.ए.बी.चौधरी हे १९९९ पासून विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेत कार्यरत आहेत. यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी दीड वर्ष काम पाहिले आहे. यापुर्वी त्यांनी दोन वेळा प्रभारी कुलसचिव म्हणून काम केले आहे. व्यवस्थापन परिषद सदस्यपदी देखील त्यांनी काम केले आहे. जैवशास्त्र प्रशाळेच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागात ते विभाग प्रमुख म्हणून राहीले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून पाच विद्यार्थ्यांनी प्रबंध सादर केले आहेत. प्रा.बी.व्ही.पवार यांच्याकडून त्यांनी प्रभारी कुलसचिवपदाची सुत्रे स्वीकारली. या छोटेखानी समारंभास व्य.प. सदस्य दिलीप पाटील, प्रा.एल.पी.देशमुख, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील व अधिकारी उपस्थित होते. 

Protected Content