महिला वकिलांच्या केस विंचरण्याने न्यायालय विचलीत !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कायद्यासारख्या तशा रूक्ष वाटणार्‍या क्षेत्रात देखील अनेक घटना अशा घडतात की डोक्याला हात लावावासा वाटतो. असाच एक किस्सा पुणे न्यायालयात घडला असून याची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

पुणे न्यायालयाने महिला वकिलांसाठी एक नोटीस जारी केली आहे. हीच नोटीस आता वादाच्या भोवर्‍यात सापडल्याचे दिसून आले आहे. या नोटीसीनुसार पुणे न्यायालयात अनेक महिला वकिल या वारंवार केस विंचरतात, अथवा ते व्यवस्थित करत असल्याने याचा कामकाजावर परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे महिला वकिलांनी वारंवार केस विंचरू नयेत असे या नोटीसीत बजावण्यात आलेले आहे.

पुणे न्यायालयाने सदर नोटीस ही २० ऑक्टोबर रोजी बजावली आहे. यावरून आता वाद सुरू झाले आहेत. ज्येष्ठ विधीज्ज्ञ इंदिरा जयसिंग यांनी या नोटीसीचे छायाचित्र ट्विट करून याबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. यावरून आता वाद-प्रतिवाद झडू लागले आहेत. न्यायालयाच्या प्रशासनाने बजावलेली नोटीस ही महिलांसाठी अवमानकारक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर, हा नियम न्यायालयाचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी लागू करण्यात आल्याने याचे अनेक जणांनी समर्थनही केले आहे.

Protected Content