बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण ! : गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या विरोधातील आक्रोश वाढत असतांना या सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, बंडखोर आमदार हे गुवाहाटीत असून त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने या सर्व आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गुवाहाटीत गेलेले सर्व जण महत्वाचे लोकप्रतिनिधी असून त्यांच्या विरोधातील जनभावना पाहता या सर्वांच्या कुटुंबियांना संरक्षण पुरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, याआधी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या घरावर हल्ले होण्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. तर राज्यात आजही ठिकठिकाणी बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात येत आहे. आज शिंदे गटातर्फे काय हालचाली होणार याची माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून यात बंडखोरांकडे असलेल्या पक्षाची पदे रद्द करण्यात येतील अशी शक्यता आहे.

 

Protected Content