मोठी बातमी : सुरू राहणार मनोज जरांगेंचे उपोषण !

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने कुणबाी दाखल्यासाठी उचललेले पाऊल हे स्वागतार्ह असले तरी सरसकट प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी आपला लढा सुरूच राहणार असल्याची आज घोषणा केली.

मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात उपोषण सुरू केले असून आज याचा दहावा दिवस आहे. काल दिवसभर अनेक घडामोडी झाल्या. यात प्रामुख्याने राज्य मंत्रीमंडळाने निजामकालीन कुणबी नोंदी असलेल्या कुटुंबांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचा निर्णय घेतला.  तर, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा देखील करण्यात आली. या निर्णयांच्या नंतर मनोज जरांगे यांनी गुरूवारी सकाळी अकरा वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते.

या अनुषंगाने मनोज जरांगे-पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारच्या दोन्ही निर्णयांचे स्वागत केले. तथापि, अनेक कुटुंबांकडे कुणबी नोंदी नसल्याने या निर्णयाचा त्यांना काहीही लाभ होणार नसल्याचे ते म्हणाले. यामुळे सरसकट कुणबी समाज प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर आपण ठाम असून याचमुळे आपले उपोषण कायम ठेवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्य सरकारचे दोन्ही निर्णय चांगले असले तरी यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे ही मागणी त्यांनी लाऊन धरल्याचे आज पुन्हा अधोरेखीत झाले आहे.

Protected Content