भाजपचे नैतिक र्‍हासपर्व ( भाष्य )

अमळनेरातील महायुतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर झालेला हाणामारीचा प्रकार हा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक लज्जास्पद अध्याय म्हणून गणला जाणार आहे. राजकारण ही विचारांची लढाई मानली जाते. येथे विचाराचा प्रतिकार विचारानेच करणे अपेक्षीत असते. अगदी विरोधकांसोबतही शालीन, सुसंस्कृतपणे वागणे अभिप्रेत असते. मात्र जिथे स्वकीयच लाथा-बुक्क्यांवर उतरतात, जिथे लोकशाही ही ठोकशाहीत परिवर्तीत होते; तिथे नैतिक पतनाचा प्रारंभ होतो. अलीकडच्या काही घटना या भाजपच्या नैतिक र्‍हासपर्वाची नांदी ठरल्या होत्या. अमळनेरातील धुडगुस हा यावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वाधीक काळ सत्तेत असणार्‍या काँग्रेस पक्षाने आपल्या वाटचालीत काही सिस्टमाईज्ड पॅटर्न तयार करून ठेवले आहेत. यात विलक्षण शक्तीमान हायकमांड आणि सर्वस्वी त्यांच्या अंकीत असणारी नेते मंडळी अशी एक इको-सिस्टीम रूळविण्यात आली. अर्थात, नेत्यांना प्रशासनात अथवा पक्षात महत्वाची पदे देतांना त्यांच्या खुर्चीखाली फटाके लावण्याची व्यवस्थादेखील करायची असला प्रकार भारतीय राजकारणात रूढ झाला आहे. फॅमिली बिझनेसप्रमाणे चालवण्यात येणारे राजकीय पक्षच नव्हे तर वरवरून लोकशाहीचा मुलामा असणार्‍या पक्षांमध्येही आता याचा सर्रास वापर केला जातो. काँग्रेसने प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांना सातत्याने अस्वस्थ ठेवण्याचे काम केले. तर मुख्यमंत्र्यांसह अन्य मातब्बरांनी हा पॅटर्न थेट जिल्ह्यापर्यंत नेऊन ठेवला. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतही हेच केले. आठवून पहा, काही वर्षांपूर्वी सत्तेत असणार्‍या राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांमधीही हाच प्रकार होता. अर्थात, राष्ट्रवादीत अनेक गट-तट तयार करण्यात आले. बरं गमतीची बाब अशी की, एकमेकांविरूध्द लढणार्‍या तमाम नेत्यांसाठी साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती. अर्थात, एकमेकांशी भांडायचे आणि साहेबांसमोर सर्वांनी एकत्रीतपणे नम्रतेने उभे रहायचे असा प्रकार आपण सर्वांनी आधीच पाहिला आहे. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हीच संस्कृती भाजपने अगदी शत-प्रतिशत प्रमाणात उचलली. केंद्रात मोदी आणि शाह या जोडगोळीने एका फटक्यात पक्षातील बहुतांश प्रतिस्पर्ध्यांना एक तर गारद केले अथवा त्यांना जखडून ठेवले. हाच पॅटर्न महाराष्ट्राची सूत्रे हाती मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राबविला. त्यांनी डोईजड झालेल्यांनी एकामागून एक या प्रकारे खड्यासारखे बाजूला करण्याचा प्रकार अवलंबला. त्यांनीही ठिकठिकाणी भाजपच्या मातब्बर नेत्यांसमोर आपल्या निकटवर्तीयांना उभे केले. यातून जिल्ह्याजिल्ह्यात सवते-सुभे निर्माण झाले. याचाच एक भयंकर अध्याय जळगाव जिल्ह्यात सुरू झाला. याचीच कटू फळे आज जगासमोर अतिशय विद्रूप स्वरूपात दिसून येत आहेत.

गत सुमारे अडीच दशकांपासून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांना महत्वाची खाती दिली. मात्र मुख्यमंत्र्यांना डोईजड झालेल्या खडसे यांना हटविण्यासाठी त्यांच्यासमोर महाजन यांना समोर करण्यात आले. यातून निर्माण झालेले सूडचक्र आता गटबाजीच्या पलीकडे जात अश्‍लील क्लिपमार्गे मारहाणीपर्यंत येऊन ठेपले आहे. खरं तर, खडसे आणि महाजन यांनी एकत्रीतपणे प्रयत्न केले असते तर जिल्ह्यात विकासगंगा नव्हे तर किमान विकासाची तापी/गिरणा नदी तरी वाहिली असती. मात्र आजही महापालिकेच्या सतराव्या मजल्यावरून जरी दुर्बिण घेऊन पाहिले तर फक्त विकासाचा लेंडी नालाच वाहतांना दिसतो. अर्थात, काँग्रेसी पॅटर्ननुसार भाजपच्या वरिष्ठांनी जिल्ह्यातील नेत्यांचा वापर करून म्हणजेच त्यांना एकमेकांसमोर उभे करून स्वत:चा स्वार्थ साधून घेतला. नेते भांडणांमध्ये मग्न तर जनता कामे होत नसल्यामुळे त्रस्त असा हा सर्व प्रकार सध्या सुरू आहे. आता हे दुखणे सुधरण्याच्या पलीकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे यावर अचूक मात्रा लागू करायची असेल तर कठोर निर्णयाची आवश्यकता आहे. मारहाण प्रकरणात चौकशी करून जो कुणी दोषी आढळेला त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवावा. यामुळे इतरांवर वचक बसेल. अन्यथा काल जे अमळनेरात घडले ते कधीही जिल्ह्यातील दुसर्‍या कोणत्याही गावात घडू शकते. कारण जळगाव जिल्हा भाजप ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. यातील तीव्र द्वेषरूपी ज्वालारस हा भाजपच्या जिल्ह्यातील पिछेहाटीस कारणीभूत ठरू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन जोवर खर्‍या अर्थाने एकत्र येत नाहीत. तोवर हा कलह मिटेल असे आज तरी वाटत नाही. तूर्तात, भाजपमध्ये जे काही सुरू आहे, ते या पक्षाच्या नैतिक पतनाला स्पष्टपणे अधोरेखीत करत आहे.

Add Comment

Protected Content