गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?

 

 

मुंबई :  वृत्तसंस्था । अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलाय. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. त्याबाबत अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. अशावेळी गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर येतंय. हसन मुश्रीफ तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळतेय.

 

 

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

 

अजित पवार यांचा दांगडा अनुभव, प्रशासनावरील वचक पाहता अजित पवार यांचंही नाव गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. पण अजित पवार यांच्याकडे अर्थखात्यासारखी मोठी जबाबदारी आहे. अशावेळी त्यांच्याकडील अर्थखातं काढून गृहखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असंही बोललं जात आहे.

 

दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक क्लिन इमेज राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेची आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Protected Content