गुंतवणूकदार धास्तावले ; शेअर बाजारात चौफेर विक्री

मुंबई वृत्तसंस्था । देशांतर्गत नकारात्मक घडामोडी आणि करोनाचा प्रकोप याची भीती गुंतवणूकदरांच्या मनात घर करून बसली आहे. आज सलग सहाव्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५२५ अंकांनी कोसळला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा १८५ अंकांनी कोसळला असून त्याने ११ हजार अंकांची पातळी तोडली आहे. तासाभरात गुंतवणूकदारांचे जवळपास दीड लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरु केला. बँका, वित्तसंस्था, ऑटो, एमएफसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रात मोठी विक्री झाली. इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, मारुती, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

विमान कंपन्यांच्या शेअरला मोठा फटका बसला. स्पाईस जेट १० टक्के आणि इंटरग्लोब एव्हिएशन ६ टक्के घसरले. इंडियाबुल्स रियल इस्टेट, सन टेक रियल्टी, फिनिक्स मिल, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टी आदी शेअरमध्ये मोठी घसरण झाली. सध्या सेन्सेक्स ३७०१२ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी १०९३६ अंकांवर आहे.

जागतिक बाजारांचा विचार करता आशिया, अमेरिका आणि युरोपात भांडवली बाजार निर्देशांक कोसळले. अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा कोरोना संकटात अडकल्याने ती सावरण्याची शक्यता धूसर झाली. परिणामी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री करून गुंतवणूक काढून घेतली. त्याचे पडसाद आज आशियात उमटले. ऑस्ट्रेलिया, जपान, हॉंगकॉंग आणि सिंगापूर शेअर बाजारात पडझड झाली.

Protected Content