गिरडगाव पाझर तलावाच्या परिसरात अवैध वृक्षतोड ; ग्रामस्थांची कारवाईची मागणी


यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या अंतर्गत येणाऱ्या गिरडगाव येथील पाझर तलावातील परिसरातील अंदाजे सुमारे पन्नास जिवंत बहुमूल्य वृक्षांची कत्तल एका लाकूड माफियांच्या माध्यमातून झाल्याचे आढळून आले असून या लाकडू माफियांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाझर तलाव परिसरात गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील व सरपंच पती मधुकर जगन्नाथ पाटील व उपसरपंच आनंदा दगडू पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर वृक्षांची कत्तल झाल्याचे आढळून आले. त्याठिकाणी किनगाव येथील एक लाकूड व फर्निचरचा व्यापारी हा आपल्या काही मजुरांसह पाझर तलाव कार्यक्षेत्रात घटनास्थळी वृक्षतोड करतांना आढळून आला असता त्या ठिकाणी व्यापाऱ्यास संबंधित व्यक्तीस नागरिकांनी वृक्षतोडी यासंदर्भात विचारणा केली. त्याने सांगितले की, आपणास शेजारील नायगाव येथील शेतकरी शांताराम पाटील यांनी मला ही झाडे विकल्याचे सांगितले. पण प्रत्यक्ष पाहणी केली असता सर्व कापलेली झाडे ही शेतकऱ्याच्या मालकीचे नसून ते पूर्ण धरणाच्या कार्यक्षेत्राच्या आतील असल्याचे त्याचे अशाप्रकारे वृक्षांची सर्रासपणे कत्तल करण्याचा आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याविषयी त्यांनी संबंधित लाकूड व्यापाऱ्या कडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उलटपक्षी त्या व्यापाऱ्याने मुजोरपणा दाखवून तात्काळ घटनास्थळावरून काढता पाय घेतला. सदर घटनास्थळाची व्हिडिओ क्लिप तयार केली असून ती पोलीस पाटील यांच्याकडे आहे. बहुमूल्य वृक्षांची बेकायदेशीरपणे खुलेआम कत्तलकरणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई व्हावी असे यावल तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामस्थ मंडळी व गावातील पोलीस पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे व यावलचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे ग्रामस्थमंडळी प्रत्यक्ष भेटून त्यांना चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी निवेदन सादर करणार आहेत.

Protected Content