जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनीत राहणाऱ्या तरूणाला प्लॉटचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने दोघांनी ४ लाख १६ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नितीन नामदेव पाटील (वय-३२) रा. गुरूदत्त कॉलनी गणेश कॉलनी हे होन्डा शोरूमवर काम करतात. त्याच्या शेजारी राहणारे एकनाथ उर्फ राजू सुभाष गुरव यांच्याशी घरोबाचा नाते निर्माण झाले होते. एकनाथ गुरव हा रिअल इस्टेट ब्रोकरचे काम करतो. कामासाठी मला ६ लाख रूपये दे असे सांगल्यावरून विश्वासाने नितीन पाटील यांचे वडील नामदेव पाटील यांनी मार्च-२०१९ मध्ये संशयित आरोपी एकनाथ उर्फ राजू सुभाष गुरव व त्याचे वडील सुभाष प्रभाकर गुरव रा. भुसावळ यांना शहरातील येथील अजिंठा चौफुली जवळील अदित्य होंडा शोरूम मध्ये ६ लाख रोख रूपये दिले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर नितीन पाटील यांनी पैसे मिळण्यासाठी तगादा लावला. ६ लाखांपैकी १ लाख ८४ हजार रूपये परत दिले. मात्र उर्वरित रक्कम ४ लाख १६ हजार रूपये अजून पर्यंत परत केली नाही. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून राजू सुभाष गुरव आणि सुभाष प्रभाकर गुरव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहे.