गंमत – जंमत , कल्पनांची भरारी , आनंद ही बालकवितेची भूमिका असते : मायाताई धुप्पड

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ” गंमत – जंमत,कल्पनांची भरारी,आनंद ही बालकवितेच्या लेखनाची भुमिका असते. बालकांच्या अवती भवती असणारे प्राणी, पक्षी, पाने – फुले ,खेळ, व्यक्ती इत्यादी विषय कवितेतून मुलांना साद घालतात. कवितेतील नाद , ताल , लय बालकांना कविता गुणगुणायला लावतात. बालकांना आनंददायी मनोरंजन देण्याचे सुगंधी काम विनम्रपणे मी  बालकविता लेखनातून करते.” असे प्रतिपादन बालसाहित्यिका माया धुप्पड यांनी केले.

 

प्रेमनगर येथील स्व.शेठ बी.एम.जैन प्राथमिक विद्यालय येथे स्व. प्रेमाबाई जैन सभागृहात बुधवार दि.१४ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना धुप्पड बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर फुलपगार असून प्रमुख अतिथी शालेय समितीच्या सदस्या साधना शर्मा व कार्यक्रमाचे संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगावचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे  मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आयोजित “अनमोल भेट बालकविता संग्रहांची अभियानांतर्गत ” साहित्यिक विद्यार्थ्यांच्या भेटीला या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

प्रारंभी माया धुप्पड यांनी मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर केल्या. तद्नंतर बाबा आणि आई व बाहुलीचा नट्टा पट्टा या कवितेचे सुश्राव्य गायन  केले.  भिंगर भिंगरी, मुंगी डान्स, जंगलचा राजा , माकडेच माकडे,  अटक मटक ,बेडूक बेडूक या कवितांचे उपस्थित बालगोपालांकडून तालातुरात अनुगायन करून घेतले.अनुगायनात विद्यार्थ्यांनी ठेका धरून त्यांना उत्स्फूर्त साथ दिली.

कविता वाचनापूर्वी सुनिता फुलपगार यांनी गीतकार माया धुप्पड  व  विजय लुल्हे यांचा शैक्षणिक,वाड़मयीन व सामाजिक कार्य परिचय करून दिला. मार्गदर्शनात साधना शर्मा  म्हणाल्या की,’ जीवनाभिमुख बालविश्वातील नाट्यमय प्रसंग, मनमोहक शब्दरचना, मंत्रमुग्ध नादमधुरता ही धुप्पड मॅडम यांच्या कवितेची यशस्वी त्रिसुत्री आहे. आज काव्यवाचनातून बालकांच्या स्पंदनात कवितेचं नंदनवन धुप्पड मॅडम यांनी फुलविल्यामुळे या शाळेशी त्यांचे अतूट ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. परीणामी , दरवर्षी मुलांच्या मनोरंजनात्मक प्रबोधनासाठी माननीय धुप्पड मॅडम यांना यावेच लागेल असे शर्माजींनी प्रेमादरपूर्वक हक्काने जाहिर केले.”

संयोजक विजय लुल्हे यांनी  पुस्तक भिशीची संकल्पना व कार्यवाहीची दिशा स्पष्ट केली. वाचन आत्मसमृद्ध करून कलाभिव्यक्तीसाठी सक्षम व समर्थ करते असे सांगितले.  अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक भास्कर फुलपगार यांनी वाचनाचे व्यक्तीमत्व विकसनातील फायदे सोदाहरण सांगितले. “अनमोल भेट बालकविता संग्रहांची ” या अभियानांतर्गत माया धुप्पड यांनी शाळेच्या बालवाचनालयासाठी स्वलिखित दर्जेदार  बालकवितेच्या एकूण १७ संग्रहांची अनोखी भेट मुख्याध्यापकांना सुपूर्द केली.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी आयोजित सुप्रसिद्ध कवयित्री,बालसाहित्यिका माया दिलीप धुप्पड यांच्या ” मनमोर काव्यचित्र प्रदर्शनाचे ” उद्घाटन प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका साधना शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाची प्रस्तावना सुनिता फुलपगार सुत्रसंचालन कल्पना देवराज व आभार संगिता निकम  यांनी मानले. मनमोर काव्यचित्र प्रदर्शनाच्या मांडणी व सुशोभनासाठी लिपिक नरेंद्र चौधरी, शिपाई गोपाळ मराठे, गेटमन सुनिल इंगळे यांचे सहकार्य लाभले .

 

Protected Content