नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर लस चाचणी सुरु करण्यात आली आहे. देशातील ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण देखील अधिक असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर ट्रायल करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. चाचणीसाठी मुलांचं वय किमान २ वर्षे असायला हवं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर ट्रायल करण्यास सुरुवात झाली आहे.
२ जूनला पाटण्यातील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. डोस घेण्यासाठी एकूण १५ मुलं आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यात ३ मुलं चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला. लस दिल्यानंतर या मुलांना जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. आता या मुलांना लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील, ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. प्राणवायू खाटांची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागेल.