नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लशीच्या साठवण काळात तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सहा महिने असलेल्या लशीच्या साठवण काळात नऊ महिनेपर्यंत वाढ झाली आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही, याबाबत मौन बाळगण्यात आले आहे.
साठवण काळात वाढ करण्याबाबत आवश्यक माहिती केंद्रीय औषध महानियंत्रकांना सुपूर्द केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सीरममधील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. साठवण काळ वाढवण्याबाबत परवानगी देताना केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून लस उत्पादक कं पनीने दिलेल्या अद्ययावत माहितीचा उपयोग केला आहे.
कोणत्याही औषध किंवा लशीला तातडीच्या वापराची परवानगी देताना उत्पादक कंपनीने त्या वेळी पुरवलेल्या माहितीच्या आधारावर साठवण काळ निश्चित केला जातो. सीरमतर्फे अद्ययावत माहिती मिळाल्यानंतर हा काळ वाढवण्याची परवानगी उत्पादकाला देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला ६०-७० दशलक्ष डोस तयार होत आहेत. मात्र, कंपनीकडे लशींच्या डोसचा कोणताही राखीव साठा उपलब्ध नाही. भारत सरकारने नुकतीच १०० दशलक्ष डोसची मागणी नोंदवली असल्याचेही सीरममधील सूत्रांनी सांगितले. देशात सध्या सुरू असलेल्या प्रतिबंधक मोहिमेत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर होत आहे.