जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर थैमान घातले असताना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून याकरीता 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर व चाळीसगाव येथील रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे. तसेच धरणगाव व चोपडा येथील रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांसाठी कोट्यावधी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याठिकाणी आवश्यक त्या सुविधांकरीता सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणात मदत करीत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युची संख्या जरी जास्त असली तरी मृत्य झालेल्या अनेक रुग्णांना इतरही आजार होते. तसेच अनेक नागरीक कोरोनाची लक्षणे असली तरी वेळेवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहे. तेव्हा नागरीकांनी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तातडीने रुगणालयात आले पाहिजे व उपचार घेतले पाहिजे असे आवाहनही त्यांनी नागरीकांना केले.
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा खरीप हंगामासाठी सज्ज झाली असून खते, बीयाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात केळी विकास महामंडळाचे मुख्यालय व्हावे याकरीता मंत्रीमंत्रळाच्या बैठकीत मागणी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून पोखरा अतंर्गत जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेऊन शेतीउपयोगी उपकरणे खरेदी केली आहे. त्यांना त्याची रक्कम मिळण्याची मागणीही शासनाकडे केली आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, नागरीकांनी लॉकडाऊनच्या पुढील काळात रस्त्यांवर गर्दी करु नये, आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर जावू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. सॅनेटायझरचा वापर करावा. नागरीकांच्या सहकार्याने आपण कोरोनावर निश्चितपणे मात करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला
.
कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस आयसीएमआरची मान्यता- जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मागील काळात वेळ लागत होता. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस आयसीएमआरची मान्यता आजच मिळाली आहे. त्यामुळे आत जिल्ह्यातील नमुने तपासण्यास विलंब लागणार नाही. दररोज 135 पेक्षा अधिक नमुने तपासले जातील. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. 22 मे पासून लॉकडाऊनचे काही निर्बध शिथिल होणार असले तरी महापालिका क्षेत्र हे रेडझोन मध्ये असून उर्वरित जिल्हा हा नॉनरेड झोन मध्ये आहे. त्यामुळे नॉनरेडझोन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन व्यवहार सुरु राहणार आहे. मात्र मॉलमधील दुकाने सुरु करता येणार नाही असे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना बाधित रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळावेत याकरीता येथील कोविड रुगणालयात अजून 10 आयसीयू बेड वाढविण्यात आले आहे. तर रुग्णालयातील सर्व बेडना ऑक्सिजन पुरवठा करण्याची सुविधा तयार करण्यात येत आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींना तातडीने उपचार उपलब्ध व्हावे याकरीता कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्यावेत, कोरोनाला रोखण्यासाठी अमळनेरला मोठ्या प्रमाणात नागरीकांची तपासणी करण्यात आली तेव्हा मोठया प्रमाणात रुग्ण आढळून आले व उपचारानंतर ते बरेही झाले हाच पॅटर्न भुसावळ व जळगावात राबविण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी यावेळी सांगितले.