मोहित कंबोज हाच किडनॅपींगचा खरा सूत्रधार : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | आर्यन खान प्रकरणातील किडनॅपींगचा खरा सूत्रधार भाजपचा पदाधिकारी मोहित कंबोज हाच असल्याचा खळबळजनक आरोप अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.

काल भाजपचे प्रवक्ते मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडी आणि त्यातही राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आज नवाब मलीक यांनी पत्रकार परिषदे हे आरोप खोडून काढत भाजवर आरोपांची सरबत्ती केली आहे. याप्रसंगी मलीक म्हणाले की, आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने त्याला पार्टीला बोलावलं होतं. हे किडनॅपिंगचं प्रकरण होतं. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कुणी नसून मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो १२ हॉटेल चालवतो असल्याचा धक्कादायक आरोप देखील मलिक यांनी केला.

मलीक पुढे म्हणाले की, ७ तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमी जवळ भेटले होते. तिथल्या लोकांनी मला सांगितलं. मात्र, त्यांचं नशीब चांगलं होतं की पोलीसांचं सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. ९ तारखेला मी एक पीसी घेतली होती. त्यावेळी एक व्हिडीओ दाखवला होता. त्यात वानखेडे ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगत असल्याचं दिसत होतं. त्यावर ८ की १० लोकांना ताब्यात घेतलं? एक अधिकारी नेमका आकडा का सांगत नाही? असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन ८ नव्हे तर ११ लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा,ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना एनसीबी कार्यालयातून घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने पीसी घेऊन १४ लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या १४ लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे, असंही ते म्हणाले.

मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. त्याने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचं पद दिलं. या घोटाळ्याप्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झाले असल्याचा आरोप देखील मलीक यांनी याप्रसंगी केला.

Protected Content