जळगाव (प्रतिनिधी) राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्व विभागीय आयुक्त महसूल विभाग, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता पोलीस आयुक्त यांनाही सक्षम अधिकारी घोषित करण्यात आले आहे.
राज्यात 13 मार्च, 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम, 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. साथरोग अधिनियम 1897 च्या खंड 2 ते 4 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. व या नियमांना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 असे संबोधण्यात आले आहे.
साथरोग अधिनियमाच्या खंड 2 (1) नुसार आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक, आरोग्य सेवा-1 संचालक आरोग्य सेवा-2, संचालक, वैद्यकीयय शिक्षण व संशोधन सर्व विभागीय आयुक्त महसूल विभाग, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता पोलीस आयुक्त यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ही अधिसूचना राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती निवारण कायदा 2005 लागू असेपर्यंत अंमलात राहील. असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एका शासकीय परिपत्रकान्वये कळविले आहे.