‘बुरखा बंदी’च्या मागणीवरून संजय राऊत यांचे घुमजाव

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय. तिहेरी तलाकबाबतही शिवसेनेची भूमिका सामाजिक सुधारणेची जास्त व धार्मिक कमी अशीच आहे’, असे स्पष्टीकरण देत सामानाचे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात मांडलेल्या बुरखाबंदीच्या भूमिकेवरून घुमजाव केले आहे. ‘मि. ओवेसी, घटना पुन्हा वाचा’ मथळ्याखालील रोकठोक या सदरात राउत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

श्रीलंकेत मुस्लिम महिलांना बुरख्यावर बंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा भारतात पहायला मिळत आहे. सामनामधून बुरखा बंदीची मागणी होताच त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात पहायला मिळाले. विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच बुरखा बंदीची मागणी महाग पडू शकते, लक्षात येताच संजय राऊत यांनी कोलांटी उडी घेतली आहे. अग्रलेख प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्ता निलम गोऱ्हे यांनी ही शिवसेनेची भूमिका नसून राऊत यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे म्हटले होते. मात्र, राऊत यांना गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण रुचले नसल्याचे स्पष्ट झाले होते. राऊत यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना गोऱ्हे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यामुळे, सामनामध्ये बुरखा बंदी संदर्भात लिहिण्यात आलेल्या अग्रलेखावरून शिवसेनेच्यानेत्यांमध्येच फूट पडल्याची दिसून आले होते.

Add Comment

Protected Content