कोरोना लसीचे २ डोस सक्तीचे ; हयगय करू नका — मोदी

 

मुंबई : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोरोना लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक आहे. कोणीही हयगय करुन चालणार नाही.”

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसी पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी एका गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करुन देणार आहे की, कोरोनावरील लसीचे दोन डोस घेणं खूप गरजेचं आहे. मी सर्वांना विनंती करतो की, केवळ एक डोस घेऊन विसरुन जाऊ नका. दुसरा डोसदेखील आठवणीने घ्या. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एक महिन्याचा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी तुमच्या शरीरात कोरोनाशी लढणारी शक्ती (कोरोना विषाणूशी लढणाऱ्या पेशी) विकसित होतील. तुम्ही कोरोनाकाळात खूप संयम ठेवलात. असाच संयम तुम्ही लसीकरणादरम्यानही ठेवाल, अशी अपेक्षा आहे. लसीकरणानंतरही फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे गरजेचे असेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या दिवसाची संपूर्ण देशवासियांनी खूप वाट पाहिली आहे. कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न प्रत्येक देशवासियाला पडला होता. आजपासून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होत आहे. मी सर्व देशवासियांना यासाठी शुभेच्छा देतो. ही लस विकसित करणारे शास्त्रज्ञ, लसीशी निगडित लोक कौतुकास पात्र आहेत. त्यांनी कुठलाही सण पाहिला नाही, ना दिवस पाहिला ना रात्र. लस निर्माण होण्यास अनेक वर्ष लागतात. पण भारतात खूप कमी काळात दोन लसींची निर्मिती करण्यात आली आहे. अजून काही लसींचं संशोधन सुरु आहे. हे भारताचं मोठं यश म्हणावं लागेल.

“भारताची लसीकरण मोहीम मानवीय आणि महत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्याला सर्वाधिक गरज आहे, जो कोरोना रुग्णांशी थेट संपर्कात आहे त्याला सुरुवातीला लस दिली जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार. त्यानंतर देशाची रक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, सफाई कर्मचारी आदींना लस दिली जाणार आहे. त्या सर्वांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करेल. या लसीकरणाच्या तयारीसाठी राज्य सरकारांच्या सहकार्यानं ट्रायल्स, ड्राय रन केलं आहे. कोविन अॅपद्वारे लसीकरण मोहीमेवर लक्ष दिलं जाईल,” असंही मोदी म्हणाले.

भारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच ३ कोटी लोकांना लस देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम ३० कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि गरज असलेल्या लोकांनाच लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोही आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावी लागेल. आपले शास्त्रज्ञांनी दोन्ही भारतीय बनावटीच्या लसीबाबत खात्री पटल्यानंतरच आपत्कालीन लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील ६० टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे.

“आम्ही दुसऱ्यांच्या कामी आलो, हा निस्वार्थ भाव आपल्या मनात असला पाहिजे. आज आम्ही गेल्या वर्षाकडे पाहिलं तर एक राष्ट्र म्हणून आम्ही खूप शिकलो आहोत. घरातील एखादा व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब त्याची सुश्रृषा करतं. पण कोरोनाने आजारी व्यक्तीलाच एकटं पाडलं. अनेक लहान बाळं आईविना रुग्णालयात उपचार घेत होते. अनेक वृद्ध नागरिक आपल्या कुटुंबाविना अनेक दिवस रुग्णालयात होते. कोरोनामुळे मृत्य पावलेल्या लोकांना आपल्या कुटुंबातील कुणी पाहू शकला नाही. कोरोनामुळे समाजात एकप्रकारचं नैराश्य पसरलं होतं. पण नैराश्याच्या या वातावरणात कुणीतरी आशा जागृत करण्याचा प्रयत्न करत होतो. अशावेळी काही लोक आपल्यासाठी त्यांचं आयुष्य संकटात टाकत होते. डॉक्टर, नर्स, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. त्यांनी अनेक दिवस आपल्या मुला-बाळांना नातेवाईकांना पाहिलं नाही. त्यातील काही सहकारी तर घरी परतू शकले नाहीत. त्यांनी एक-एक जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पहिली लस म्हणजे कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आहे.” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Protected Content