कोरोना रुग्ण पोलीस कर्मचाऱ्याला मुदतबाह्य औषधी देऊन उपचार !

 

बुलढाणा:  वृत्तसंस्था । बुलढाण्यातील कोव्हिड रुग्णालयात कोरोना झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार करण्यासाठी चक्क मुदत उलटून गेलेली औषधे वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

दिगंबर  कपाटे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दिगंबर कपाट हे बुलडाण्याच्या धाड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. साधारण महिनाभरापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती.

 

 

कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  त्यांना उपचारासाठी बुलडाण्याच्या कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले. कपाटे यांना मधुमेहाची व्याधी असल्याने त्यांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागत असे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रात्रीच्यावेळी इन्सुलिन देण्यात आले. मात्र, इन्सुलिनच्या बाटलीवर पाहिले असता त्याची एक्स्पायरी डेट उलटून गेली होती. दिगंबर कपाटे यांनी ही गोष्ट डॉक्टरांच्या कानावर घातली. परंतु, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

 

अखेर कोरोनातून बरे होऊन घरी परतल्यानंतर दिगंबर कपाटे यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा सगळा प्रकार समोर आणला. यामध्ये त्यांनी एक्स्पायर झालेली इन्सुलिन वापरणाऱ्या रुग्णालयावर टीका केली. सध्या कपाटे यांची प्रकृती चांगली असून ते पुन्हा पोलीस ड्युटीवर रुजू झाले आहेत. मात्र, या सगळ्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे.

Protected Content