कोरोना : राज्यभरातील ५० टक्के कैद्यांची होणार सुटका

मुंबई (वृत्तसंस्था) आर्थर रोड तुरुंगात करोनाची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यभरातील ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची सुटका करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण सुमारे १७,५०० कैदी व कच्च्या कैद्यांची तात्पुरता सुटका होणार आहे.

 

 

तुरुंगांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २३ मार्च रोजी दिले होते. त्याअनुषंगानेच राज्य सरकारने निकष निश्चित करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नेमली होती. या उच्चाधिकार समितीने सध्याची एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारच्या आपल्या बैठकीत एकूण ५० टक्के कैदी व कच्चे कैदी यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यभरातील सर्व प्रकारच्या तुरुंगांमध्ये एकूण सुमारे ३५ हजार २०० कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यापैकी ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका होणार आहे.

Protected Content