कोरोना उपचारांमध्ये होणार मोठे बदल

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. आता लवकरच कोरोनाच्या उपचारांमध्येही मोठे बदल होऊ शकतात.

 

 

कोरोनाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधं आणि त्यांच्याविषयीने प्रोटोकॉल ठरवून देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने अनेक औषधांबद्दल संशोधन करण्यास सुरुवात केली आहे.

 

या संशोधनानंतर कोणत्या औषधांचा उपयोग उपचारासाठी करता येईल आणि कोणत्या औषधांचा वापर बंद होईल यावर निर्णय घेण्यात य़ेईल. सर्वात जास्त चर्चा रेमडेसिविर या इंजेक्शनची आहे. त्याच्यासंदर्भातही संशोधन सुरु आहे. या संशोधनानंतरच रेमडेसिविरबद्दलचाही निर्णय घेण्यात येईल. जागतिक आरोग्य संघटनेनेही रेमडेसिविरचा कोरोनावरच्या उपचारांवर फारसा उपयोग होत नसल्याचं सांगितलं होतं व त्याला उपचारातून हद्दपार करण्याची शिफारसही केली होती.

 

कोरोनावरच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधं आणि त्यांच्याबद्दलचे प्रोटोकॉल ठरवणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. एन.के.अरोडा यांनी सांगितलं की, अद्यापही हा आजार नवा आहे. त्यामुळे याच्या उपचारांसंदर्भातलं संशोधन सुरु आहे. याच कारणामुळे कोरोनावरच्या उपचारांबद्दलची नियमावली, प्रोटोकॉल्स वारंवार बदलत आहेत. ते म्हणाले की, संशोधनातूनच समोर येईल की कोणतं औषध जास्त प्रभावी आहे, तर कोणतं औषध फारसं प्रभावी नाही. ज्या औषधांचा प्रभाव कमी आहे, त्यांना उपचारातून कमी करण्यात येईल, तर ज्या औषधांचा चांगला परिणाम दिसत आहे त्यांना उपचारामध्ये समाविष्ट करुन घेतलं जाणार आहे.

 

रेमडेसिविर इंजेक्शनच्या संदर्भात बोलताना डॉ. अरोडा म्हणाले की या अँटिव्हायरल औषधावरही संशोधन सुरु आहे. त्या संशोधनातून अजून कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. सध्या तरी या औषधाचा वापर कोरोनावरच्या उपचारासाठी केला जातो. मात्र रेमडेसिविरच्या वापराबाबत असलेले विवाद लक्षात घेता ह्या औषधाला वापरामधून हद्दपार केलं जाऊ शकतं.

 

कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात संशोधन सुरु आहे. भारताबरोबरच अनेक देशांनी प्लाझ्मा थेरपीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चंडिगढमधले एक प्राध्यापक अरुणलोक चक्रवर्ती सांगतात, या नव्या आजारावर जगभरात संशोधन सुरु आहे. त्या संशोधनांमधून जे निष्कर्ष समोर येतात, त्याप्रमाणे उपचारांमध्ये बदल करण्यात येतात. पुढच्या काळातही उपचारांच्या स्वरुपात बदल घडू शकतात. या विषाणूचं स्वरुपही दिवसेंदिवस बदलत असल्याचं त्याच्यासंदर्भातल्या नियमावलीही बदलत आहेत आणि काही काळ बदलतही राहतील.

 

Protected Content