कोरोनामुळे यंदा हरिद्वारचा कुंभमेळा १ महिन्यांचाच

 

डेहराडून : वृत्तसंस्था । हरिद्वार येथे होणारा यंदाचा कुंभमेळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या ३० दिवसांचाच होणार आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान हरिद्वारमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे

 

देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यंदाचा कुंभमेळा कधी होईल? होईल की नाही? किती काळासाठी होईल? यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. नोव्हेंबर २०२०मध्ये उत्तराखंड सरकारने यंदाचा कुंभमेळा दोन महिन्यांऐवजी ४८ दिवसांचाच होईल, असं सूचित केलं होतं. उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी यंसंदर्भातली माहिती दिली असून मार्च महिना अखेरपर्यंत तारखांची घोषणा केली जाणार आहे.

 

दर १२ वर्षांनी कुंभमेळा होत असतो. एरवी कुंभमेळा किमान २ महिन्यांच्या कालावधीसाठी भरवला जातो. मात्र, यंदा हरिद्वार कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भिती लक्षात घेता कालावधी फक्त ३० दिवसांचाच ठेवण्यात  आल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी दिली आहे. यासंदर्भात मार्च महिना अखेरीपर्यंत संबंधित यंत्रणांना आदेश दिले जाणार आहेत.कुंभमेळ्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.

 

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ७२ तास आधी कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे   कुंभमेळ्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पास दिले जातील. ते मिळवण्यासाठी ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे महाकुंभमेळा २०२१च्या वेबसाईटवर प्रत्येक भक्ताने नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणी झालेल्या भाविकांनाच कुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल . कुंभमेळा परिसरामध्ये सामुहिक भजन किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे  स्नानाच्या दिवशीच कुंभमेळा परिसरातील दुकानांना उघडण्याची परवानगी असेल. त्यातही औषधे, अन्न, दूध, पूजा साहित्य आणि ब्लँकेट्स अशा वस्तूंची किंवा पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांनाच परवानगी देण्यात येईल  स्नानासाठी प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त २० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ६५ वर्षांवरील वृद्ध, मुले आणि गर्भवती महिलांनी यंदाच्या वर्षी कुंभमेळ्यास येऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे  यंदा मोठ्या संख्येने भाविक जमा होऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

 

Protected Content