कोरोनाच्या लसीचे १० कोटी डोस पुरवठ्याची सिरमकडून केंद्राला हमी

 

 

पुणे : वृत्तसंस्था । जून महिन्यात कोरोनाच्या लसीचे १० कोटी   डोस पुरवठ्याची हमी देणारे पत्र आज सिरमकडून केंद्राला देण्यात आले .

 

देशात लशींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. जून महिन्यात १२ कोटी लस उपलब्ध असतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे. आता सिरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारला जून १० कोटी लस देणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्युटने गृहमंत्री अमित शाह यांना दिलं आहे.

 

“आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जून महिन्यात आम्ही १० कोटी कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात ६.५ कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लशींचं उत्पादन वाढवलं आहे. सिरम इन्स्टिट्युट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटीबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरली आहे”, असं कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी दिलेल्या पत्रात सांगितलं.

 

“आम्हाला विधायक कामासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. येत्या काळात आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत”, असंही त्यांनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.

 

पुण्यातील कोविशिल्ड व्हॅक्सिन निर्मिती कंपनीत दिवसरात्र काम सुरु असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. देशातील लशींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही त्यात सांगण्यात आलं आहे. यापूर्वी सिरमने जून महिन्यात ६.५ कोटी लशींची निर्मिती केली जाईल, असं सांगितलं होतं. तसेच जुलैमध्ये ७ कोटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १० कोटी लशींची निर्मिती केली जाईल असं सांगितलं होतं.

Protected Content