कोरोनाचा फुप्फुसांवर दीर्घकालीन हानिकारक परिणाम

 

 

लंडन : वृत्तसंस्था । कोविड १९ रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मृत्यू हे फुप्फुसे निकामी झाल्याने घडले असून यात फुप्फुसांची मोठी हानी होते व फुफ्फुसातील काही पेशी या अनियमित व रोगग्रस्त बनल्याने हा रोग जास्त विकोपाला जातो असे वैज्ञानिकांचे मत आहे.

किंग्ज कॉलेज लंडन या ब्रिटनमधील प्रख्यात संस्थेच्या संशोधकांनी म्हटले आहे, कोविड १९ विषाणू संसर्गाने मरण पावलेल्या ४१ रुग्णांच्या फुप्फुस, हृदय, यकृत, मूत्रपिंड यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात सार्स सीओव्ही २ या कोविड विषाणूचे शरीरातील नेमके वर्तन व त्यामुळे होणारी हानी स्पष्ट होत आहे.

इ-बायोमेडिसीन या नियतकालिकात असे म्हटले आहे की, विषाणूचे काही विशिष्ट गुणधर्म सापडले असून काही रुग्णांमध्ये प्रदीर्घ काळ कोविड लक्षणे होती. त्यांच्यात थकवा व श्वास घेण्यात त्रास होण्याचे प्रमाण जास्त होते. जे रुग्ण मरण पावले त्यातील बहुतांश रुग्णांत फुप्फुसाची अपरिमित हानी झाली होती.

वैज्ञानिकांच्या मते ९० टक्के रुग्णात न्यूमोनियापेक्षा वेगळे गुणधर्म पर्यायाने लक्षणे, या विषाणूमुळे दिसली आहेत. फुप्फुसाच्या रक्तवाहिन्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या झाल्याने अनेकांचे मृत्यू झाले. त्यात फुप्फुसातील काही पेशी एकत्र येऊन त्यांच्या मोठय़ा पेशी तयार झाल्या. या एकत्रिकरणातून निर्माण झालेल्या पेशींना सिनसायटिका म्हणतात. विषाणूतील विशिष्ट काटेरी प्रथिनामुळे ही प्रक्रिया घडून येते. पेशींच्या पृष्ठभागावरील प्रथिनांशी कोविड १९ विषाणूचा संपर्क येतो, त्या वेळी साधारण म्हणजे निरोगी पेशींचा एक संचय होतो. त्यामुळे गुठळ्या होऊन वेदना होतात. विषाणूचा जिनोम बराच काळ श्वासमार्गातील पेशींमध्ये राहिल्याने हे घडून येते. निरोगी पेशी व सिनसायटिका पेशी या दोन्हींमध्ये हा विषाणू हस्तक्षेप करीत असतो.

संसर्ग झालेल्या पेशी या फुप्फुसात प्रमुख रचनेचे बदल घडवून आणतात. ते अनेक आठवडे व काही महिने टिकून राहतात, त्यामुळे कोविड दीर्घकाळ शरीराला हानिकारक असतो. कोरोना केवळ विषाणूग्रस्त पेशी मरण पावल्याने होत नाही, तर तो या रोगग्रस्त व अनियमित पेशी फुप्फुसात बराच काळ टिकून राहिल्याने होतो, असे सह संशोधक मॉरो गियाका यांचे मत आहे.

Protected Content