कोरोनाचा प्रतिकार : नाशिकमध्ये नितीन करीर यांच्या उपस्थितीत बैठक

नाशिक प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर आज राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथे बैठक घेण्यात आली. यात करीर यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना नितीन करीर म्हणाले, राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या कोरोना संसर्गाच्या फैलावाचे विश्‍लेषण केले जात असून त्यात प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या कोरोना संसर्गाची कारणे ही समान आढळून येतात. परंतू जळगाव जिल्हा याला अपवाद असुन जळगावात झालेल्या कोरोना फैलावाचे स्वतंत्र विश्‍लेषण जिल्हा प्रशासनाने केल्याशिवाय त्यात ठोस उपाययोजना करता येणार नाहीत. जेवढ्या जास्त टेस्ट तेवढे पेशंट असणार व जेवढ्या जास्त प्रमाणात सर्वेक्षण केले तेवढ्या जास्त प्रमाणात या संसर्गाचा अंदाज प्रशासनाला घेता येतो. जळगांवात रुग्णवाढी सोबतच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचेही विश्‍लेषण होणे गरजेचे आहे. जळगांवात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ असुन या मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन भविष्यात संभाव्य पावसाळी साथरोग व कोरोनाचा संसर्ग यांचे एकाचवेळी आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.तसेच प्रतिबंधीतक्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत जीवनावश्यक व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचे नियोजनही जिल्हा प्रशासनाने करावेत असे निर्देश देखील करीर यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे यांनी सहभाग घेतला व आपआपल्या कार्यक्षेत्रातील वस्तुनिष्ठ माहिती महसूल विभागाचे अपर मुख्य प्रधान सचिव नितीन करीर यांना सादर केली.

Protected Content