पुणे प्रतिनिधी । शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कोथळा काढण्याची भाषा केल्याचे वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप शहराध्यक्षांनी त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार केली आहे.
याबाबत वृत्त असे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात सध्या सामना रंगला आहे. पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसण्यावरून डिवचले असता राऊत यांनी आपण पाठीत खंजीर खुपसत नसून थेट कोथळा बाहेर काढत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांचा संदर्भ दिला होता.
याच वक्तव्यावरून आता भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळुक यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. संजय राऊत यांचे हे वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आणि हिंसेला चिथावणी देणारे असून त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी मुळूक यांनी केली आहे.