मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेसचे आमदार झिशान सिध्दीकी यांनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या विरूध्द तोफ डागत थेट सोनिया गांधी यांनाच पत्र लिहले आहे.
बांद्रा पश्चिम भागातले कॉंग्रेस नेते झिशान सिद्दिकींनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार करणारं एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मला धक्काबुक्की केली आणि शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. त्यावेळी पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही बोललो नाही. पण माझी मागणी आहे भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.
काही दिवसांपूर्वी मुंबई कॉंग्रेसने मोदी सरकारविरोधात एका पदयात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेदरम्यान मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, युथ कॉंग्रेसचे अध्क्ष झिशान सिद्दिकी आणि युवा नेता सूरज सिंह ठाकूर यांच्यात राजगृहामध्ये जाण्यावरुन खटके उडाले होते. झिशान सिद्दिकी यांनाही आत जायचं होतं, मात्र त्यांना जाऊ दिलं नाही. यानंतर हाच वाद आता थेट सोनियांकडे पोहचला आहे.