आ. मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई करा: संसदीय कार्य समितीचे निर्देश

जामनेर प्रतिनिधी | वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील प्रकरणाबद्दल चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश संसदीय कार्य विभागाने दिले आहेत. या प्रकरणी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अशफाक पटेल यांनी तक्रार केली होती.

आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी २६ मार्च २०२१ रोजी जळगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कार्यालयात खुर्चीला दोराने बांधून ठेवले होते. या प्रकरणी चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील कॉंग्रेस कार्यकर्ते अशपाक पटेल यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

मंत्रालयातील संसदीय कार्य विभागातील कक्ष अधिकारी यांनी अवर सचिव गृह विभाग व विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिवांना जिल्हाधिकारी यांचे पत्र व अशपाक पटेल यांचे निवेदन पाठवून कार्यवाही करण्याचे कळविले असल्याची माहिती अशफाक पटेल यांनी दिली आहे. यामुळे आता आमदार मंगेश चव्हाण यांची नव्याने चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात अशफाक पटेल यांनी म्हटले आहे की, काही लोकप्रतिनिधी गुन्हेगारी संस्कृती निर्माण करण्यालाच राजकारण समजतात. विधिमंडळाने केलेल्या कायद्यांचा अपमान करण्याचा अधिकार लोकप्रतिनिंधींना नाही. अधिकार्‍याला त्याने आपले कर्तव्य का बजावले म्हणून दमदाटी करून त्याला अपमानाची वागणूक देणे, मारहाण करणे हे विधी मंडळाच्या अधिकारांचे उल्लंघन असून हक्कभंग आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!