आता कुणासोबत चर्चा करणार ? : अनिल परब

मुंबई प्रतिनिधी | आपण आतापर्यंत एसटी कर्मचार्‍यांच्या २८ संघटनांसोबत बोलणी केली असली तरी संपातून मार्ग निघाला नाही. यामुळे आता कुणासोबत चर्चा करणार ? असा प्रश्‍न उपस्थित करत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज हतबलता व्यक्त केली. तर अजून आपण चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

परिवहन मंत्री अनिल परब आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, आतापर्यंत एसटी कर्मचार्‍यांच्या २८ युनियनच्या कृती समितीसोबत मी चर्चा केलीय. आणखी कुणाशी चर्चा केली पाहिजे? असा सवाल करतानाच मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. बोलणी करायला येतात व जातात. पण ते परत येत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, परब पुढे म्हणाले की, हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचार्‍यांनी आपले म्हणणे मांडावे असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची ५ वाजता बैठक होतंय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावलं आहे. यानंतर बैठकीचा अहवाल समिती सीएमला देतील. एसटी कर्मचार्‍यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत सातत्याने संबंधित मंत्र्यांशी चर्चा करत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहे. हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो, एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन त्यांनी एसटी कामगारांना केलं.

परब यांनी भाजप नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा बोललो. त्यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत. ते कामगारांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील किंवा कामगार त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितित नसतील, असा चिमटा काढतानाच चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

Protected Content