केळी पीक विम्यावरून ना. गुलाबराव पाटील यांचा रुद्रावतार !

मुंबई प्रतिनिधी । राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी केळी पिक विमावरून सुरू असणाऱ्या संभ्रमाबाबत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे राज्य मंत्रिमंडळाने लवकरच याप्रश्नी नवी मुंबई येथे बैठक घेण्याचे निश्चित केले. दरम्यान आजच्या बैठकीत कपाशी उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार असल्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील केळी उत्पादकांना मोठा आघात बसला आहे. केंद्र सरकारने केळी सह अन्य पीक विमा योजनांमध्ये केलेले बदल हे शेतकऱ्यांना खूप मोठा हादरा देणारे ठरले आहेत. यामुळे हे निकष बदलण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती.  मात्र राज्य सरकारच्या या मागणीकडे केंद्राने स्थापन दुर्लक्ष करून वाटाण्याच्या अक्षदा दाखवत पत्राला केराची टोपली दाखवली. या अनुषंगाने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. केंद्र सरकारचीही भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर येणार असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारने ठाम भूमिका घेण्याची मागणी केली यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केळी पीक विम्याच्या प्रश्न लवकरच मुंबईत  जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांना दिले. दरम्यान याच बैठकीत गुलाबराव पाटील यांनी कपाशी उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला.  यावर कपाशी उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ना. गुलाबराव पाटील यांनी या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Protected Content