केंद्र सरकारने वाढवलेले इंधन दरवाढ कमी करावी; काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने गॅस व पेट्रोल इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केल्यामुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने इंधनाचे दर कमी करावे अश्या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत आज ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  देशात एकीकडे केंद्र शासन मोठमोठया उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करीत असतांना सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटत आहे. २०१४ साली मोदी सरकारने ३५ रूपयाने पेट्रोल देवु असे आश्वासन दिले होते. परंतु आज पेट्रोल- डिझेल शंभरी पार करतांना दिसत आहे. गेल्या महिनाभरात पेट्रोल – डिझेलच्या दरात रोजच्या रोज वाढ होत असून जनसामान्यांचा खिसा खाली केला जात आहे. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे प्रति बॅरलचे दर ऐतिहासिक रित्या कमी होत आहेत. संपुर्ण देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतांना उद्योगधंदे ठप्प आहेत. बेरोजगारीत भर पडत असुन महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतमालाला बाजारपेठ व भाव नाही. देशातील वाहतुक साखळी आधीच अडचणीत असुन इंधन दरवाढीने वाहतुक दरात वाढ होवुन प्रचंड महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा खाली असुन केंद्र सरकार इंधन दरवाढ करून जनतेला लुटत आहे. या दरवाढीमुळे शेतकरी, मध्यमवर्गीय, गोरगरीब, व्यापारी, कामगार असे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन अवास्तव इंधन दरवाढ करण्याऱ्या मोदी शासनाचा आम्ही निषेध केला. याप्रसंगी माजी खासगदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जमील शेख, अमजद पठाण, प्रदीप सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Protected Content