कृषी खात्याच्या ३० टक्के योजना महिलांसाठी राखीव !

मुंबई प्रतिनिधी | कृषी खात्याच्या सर्व योजनांमध्ये महिलांना ३० टक्के वाटा मिळणार असल्याची महत्वाची घोषणा कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकर्‍यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणार्‍या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना ३० टक्के राखीव असतील, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे सहसंचालक संजीव पडवळ, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, कृषी योजनांमध्ये महिला शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठीची प्रक्रिया सुलभ आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ- मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील.

याशिवाय महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत ३१ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात २१ हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला शेतकर्‍यांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असेही आवाहन कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी केले.

Protected Content