कृउबा समितीसमोर अपघातात पती-पत्नीसह एकाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या ट्रीपल सीट दुचाकीला मागून येणाऱ्या मालवाहू टेम्पोने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य  जागीच ठार झाले तर तीसऱ्याचा व्यक्तीचाही उपचारदरम्यान मृत्यू झाला. घटना कृषीउत्पन्न बाजार समितीच्या समोर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, श्यामलाल शहादूलाल केवट (वय-४०, रा. कैथा ता. अमिलिहा, रिवा , मध्यप्रदेश ह.मु. सिंधी कॉलनी) हे आपल्या पत्नीसह दोन मुली व मुलगासह राहतात. श्यामलाल हे शहरातील महेंद्र मकरेजा यांच्या जीत बेकरी मध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करतात. तर पत्नी नेवस्वा श्यामलाल केवट (वय-३८) ह्या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. श्यामलाल यांचे भाऊ दिपक साधुलाल केवट हे देखील भाजीपाला विक्री करण्याचे काम करतात. भाजीपाला विक्री करण्यासाठी दररोज ते शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ४.३० वाजता श्यामलाल केवट हे पत्नी नेवस्वा आणि भाऊ दिपक सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ७९६२) ने भाजीपाला घेण्यासाठी निघाले. 

शहरातून औद्योगीक वसाहतीच्या दिशेने जात असतांना पलीकडून येणाऱ्या छोटा हत्ती या वाहनाने धडक दिली. याचवेळी छोटा हत्ती वाहनाच्या पाठीमागे टाटा मॅजीक हे वाहन येत होते. पुढील छोटा हत्ती या वाहनाचे अचानक ब्रेक लागल्याने मागील टाटा मॅजीक हे वाहन त्यावर आदळले. या अपघातात दुचाकीचालक श्यामलाल केवट व त्याच्या मागे डबलसीट बसलेली त्यांची पत्नी नेवस्वा केवट हे दोघे जागीच ठार झाले. तर भाऊ दिपक केवट हे गंभीर जखमी झाले. दिपक यांना तातडीन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

मुलीचा आक्रोश

अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आले. मयत श्यामलाल यांच्या पश्यात २ मुली व एक मुलगा असा परिवार आहे. श्यामलाल हे जीत बेकरीत एक उत्कृष्ठ बेकरीचे कारागीर होते. आपल्या मुलीचे लग्नासाठी पैश्यांची जमवाजमव करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून पती-पत्नी मिळेल ते काम करत होते. मोठी मुलगी यंदा दहावीच्या वर्षाला आहे. मात्र काळाच्या घालाने दाम्पत्याने पाहिलेले स्वप्न पुर्णपणे भंगले. आईवडीलाचे मृतदेह पाहून मुलगी नेहाने हंबरडा फोडला. जिल्हा वैद्किय महाविद्यालयात शविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content