पुणे : वृत्तसंस्था । एकीकडे गर्दीवर बंधनं असताना दुसरीकडे पुण्यात कारागृहातून सुटका झालेल्या गुंडाची मिरवणूक काढण्यात आल्याचा धक्कादायक घडला आहे. गुंड गजानन मारणे याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. समर्थकांनी तब्बल ३०० वाहनांचा ताफा सोबत घेत ही मिरवणूक काढली.
गजानन मारणे हा खुनाच्या गुन्ह्यात तळोजा कारागृहात होता. न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केलं.
पुण्यात गेल्या काही वर्षात टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडांवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत कारागृहात रवानगी केली होती. अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एका हत्येच्या गुन्हयात गुंड गजानन मारणे याची मोक्काअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या खुनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने तिथे होती. त्यानंतर कारागृह ते थेट पुण्यापर्यंत या गाड्या घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.