काँग्रेस ‘ स्वबळावर ‘ ठाम

 

मुंबई : वृत्तसंस्था । आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.

 

यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली., महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी  राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा केली होती.

 

“महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला आहे. पक्षश्रेष्ठींचा  हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल.  कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेला नाही,” असे पटोले म्हणाले.

 

काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत लढणार का याबाबतही नाना पटोलेंनी भाष्य केले. निवडणूक तीन वर्षांनंतर आहे. यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांदरम्यान हे विधान आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकार माझे फोन टॅप करत असून काही लोक काँग्रेसच्या पाठीवर वार करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता.

 

Protected Content