काँग्रेससाठी पक्षपाताची प्रणवदांची तयारी ?

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली असती आणि कुणालाच बहुमत मिळालं नसतं तर मी काँग्रेसलाच सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं असतं, असा गौप्यस्फोट प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे.

त्यामुळे काँग्रेससाठी प्रणवदा पक्षपातीपणा करण्यास तयार होते का? असा सवालही केला जात आहे. मात्र, या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षावही करण्यात आला आहे.

प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या या अखेरच्या पुस्तकातून अनेक धक्के दिले आहेत. कुणालाच बहुमत मिळालं नसतं आणि काँग्रेसला कमी जागा मिळाल्या असत्या, पण काँग्रेसने स्थिर सरकार देण्याचं वचन दिलं असतं तर मी काँग्रेसलाच सरकार बनविण्यासाठी बोलावलं असतं. आघाडी सरकार वाचवण्याचा राजकीय पक्षांचा ट्रॅक रेकॉर्डही मी पाहिला असता, असं सांगतानाच त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येते तेव्हा स्थिर सरकार राहण्याची संविधानिक जबाबदारी आपसूक येते हे सुद्धा त्यांनी नमूद केलं आहे.

माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेसाठी पाचारण करण्याचा नियम घालून दिला आहे. पण माझ्या कृतीने या नियमांचं उल्लंघन झालं असतं. शर्मा यांनी १९९६मध्ये त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण केलं होतं. परंतु, वाजपेयी सरकारला आकड्यांची पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे २०१४च्या निवडणुकीपूर्वीच स्थिरता आणि अस्थिरता या दरम्यान तटस्थ निर्णय घेण्याचं मी आधीच ठरवलं होतं, असं सांगतानाच पण या निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळाल्याने आपण भारमुक्त झालो होतो, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच २०१४मधील काँग्रेसच्या कामगिरीवर ते अत्यंत निराशही होते.

मुखर्जी यांनी राष्ट्रपती म्हणून डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम केल आहे. या दोन्ही पंतप्रधानांचा या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा होता. त्यावरही मुखर्जी यांनी पुस्तकात भाष्य केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांना हे पद मिळालं. काँग्रेस संसदीय दल आणि यूपीएच्या मित्र पक्षांनी सोनिया गांधी यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव नाकारला, असं सांगतानाच सिंग यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान बनले. मोदी पूर्णपणे राजकारणी आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकीला सामोरे जातानाच भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. तोपर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. परंतु, लोकांच्या मनात घर निर्माण करेल अशी त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली. मोदींनी खऱ्या अर्थाने पंतप्रधानपद कमावलं आणि मिळवलंही, अशी मोदींवर या पुस्तकातून मुक्तकंठाने स्तुती करण्यात आली.

Protected Content