पंतप्रधान मोदींच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले : शरद पवार

sharad pawar in jalgaon

मुंबई (वृत्तसंस्था) झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाच राज्यातून भाजप हद्दपार झाली आहे. यामुळे देशातील इतर राज्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सरळ दिसत आहे की, भाजपला आता उतरती कळा लागली आहे आणि आता ही उतरण थांबू शकणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सुनावले आहे. सिल्व्हर ओक या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजप सत्तेपासून दूर जात असताना शरद पवारांनी तेथील जनतेचे आभार मानले. आता देशातील केवळ 5 राज्यांमध्ये भाजपची सत्ता राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यात आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये खूप फरक असल्याचे या निवडणुकीतून पुन्हा दिसून आले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सहकारी पक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्राथमिक निकालांमध्ये काँग्रेस+ पक्षांची सत्ता स्थापित होणे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान म्हणाले की सीएए आणि एनआरसी या विषयांवर मंत्रिमंडळात फारशी चर्चा झाली नाही. मात्र, गृहमंत्री स्पष्ट म्हणाले होते की एनआरसी आणणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही याचा उल्लेख होता. यानंतरही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान म्हणतात, त्यामुळे ते जे सांगतात आणि वस्तुस्थिती यात तफावत आहे”, असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

Protected Content