कर्नाटक विधानपरिषदेत राडा; सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की !

बंगळुरु । कर्नाटक विधानपरिषेदत आज गोरक्षा कायद्यावरुन भाजप व काँग्रेस आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यामुळे मार्शल्सला पाचारण करून हा वाद मिटवावा लागला आहे.

कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणार्‍या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, याला विरोधकांचा आक्षेप आहे. गेल्याच आठवड्यात कर्नाट विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. कर्नाटक मवेशी वध रोकथाम एवं संरक्षण विधेयक-२०२० असे या विधेयकाचे नाव होते. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कर्नाटकात गोहत्येवर बंदी येईल. तसेच गायींची तस्करी आणि गोहत्येत सहभागी असणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या नियमांचा या विधेयकात अंतर्भाव आहे. हे विधेयक २०१० साली भाजपने आणलेल्या कायद्याचे सुधारित स्वरुप आहे.

दरम्यान, आज हे विधेयक मांडल्यानंतर वाद सुरू झाले. याप्रसंगी जोरदार राडा झाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले. भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना सभापतींच्या आसनावरून खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी व्यक्त केली.

तर, काँग्रेसचे काही आमदार सभागृहात गुंडांसारखे वागले. कर्नाटक विधानपरिषदेच्या आजवरच्या इतिहासात आम्ही असा प्रकार पाहिला नव्हता. जनता आमच्याबद्दल काय विचार करत असेल हा विचार करुन मला शरम वाटत आहे, असे वक्तव्य भाजप आमदार लेहर सिंग सिरोया यांनी केले.

Protected Content