ओबीसी आरक्षणात कुणी वाटेकरी झाल्यास रस्त्यावर उतरू- फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षात कुणी वाटेकरी झाल्यास भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा सरकारला इशारा दिला.

अधिवेशनच्या दुसर्‍या व अखेरच्या दिवशी विरोधकांनी मराठा आरक्षणावरुन सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी केला तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही हे सरकारने आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पण जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, आम्ही मान्य करणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

फडणवीस म्हणाले की, आमच्या काळात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात कोणती स्थगिती आली नाही. पण आता घटनापीठाकडे जात असताना स्थगिती आली आणि अनेक प्रश्‍न निर्माण झाले. ज्यांना नोकर्‍या मिळाल्या आहेत त्या मराठा तरुणांवर सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारनेच कोर्टात आम्ही भरती करणार नसल्याचं सांगितलं. आ बैल मुझे बार प्रकारे कोर्टाने विचारलेलं नसतानाही राज्य सरकारने सांगून टाकलं. यामुळेच प्रक्रिया पूर्ण झालेले मराठा तरुण आज बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय असताना दुसरीकडे ओबीसी समाजासंदर्भातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्री मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली आहे. मोर्चा काढायचा असेल तर राजीनामा दिला पाहिजे. सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत असल्याचं पहिल्यांदा पाहतोय. हेच सरकारविरोधात मेळावे घेत आहे. ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी करणार नाही हे सरकारने स्पष्ट सांगण्याची गरज आहे. मंत्र्यांनी हे मंत्रीमंडळात सांगायची गरज आहे आणि तसा ठराव घ्या. आम्ही मराठा आरक्षण करताना तशी तरतूद केली असून ओबीसीला संरक्षण दिलं आहे असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत विसंवाद नाही असं सांगतात पण वीज बिलावरुन काय संवाद आहे अशी विचारणा त्यांनी केली. जी वीज वापरलीच नाही त्याचं बिल कसं भऱणार? अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली. महाविकास आघाडीत संवाद निर्णयात दिसू द्या असं सांगताना सरकारने वीज बिलासंबंधी घोषणा करुन फसवणूक केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

Protected Content