सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनी ‘कोरोना’चे भजन थांबवायला हवे : सामना

मुंबई (वृत्तसंस्था) लोकांना जगायचे आहे. आज लोकं इस्पितळात मरत आहेत. त्यांना मृतदेहांची भीती वाटत नाही, पण लॉक डाऊननंतर होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्था यामुळे घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनीही ‘कोरोना’चे भजन थांबवायला हवे. सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील. ‘लॉकडाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तर कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच जनतेला मिळावे अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे.

 

अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, लोकांना आजच जगायचे आहे. त्यांना उद्याचा हवाला नको. अगदी रुग्णालयात बाजूला मृतदेह ठेवून उपचार होत असतील तरी त्यांना जगायचे आहे. आज जे काही आर्थिक संकट ओढवले आहे ते करोनामुळे असले तरी कोणत्याही सरकारला हातावर हात धरून बसता येणार नाही. सरकारनं आता लोक कामाधंद्याला कसे लागतील हे पाहायला हवे. त्यासाठी सरकारने करोनाच्या तिरडीवरून उठायला हवे. मात्र, लॉकडाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तरही जनतेला मिळायला हवे,’ अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. त्यामुळे राज्यावरील अस्थिरतेचे सावट दूर झाले व सर्व काही मनाप्रमाणे झाले. याचा आनंद राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना असला तरी जनतेचे संकट कसे दूर व्हायचे, हा प्रश्नच आहे. लॉक डाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? असा प्रश्न राहुल गांधींपासून अनेक प्रमुख नेत्यांनी विचारला आहे. या घडीला तोच प्रश्न महत्त्वाचा असून सरकारकडे त्यावर उत्तरही नाही आणि उताराही दिसत नाही. लॉक डाऊन काढायचा की वाढवायचा? याचा निकाल काहीही लागला तरी दोन्ही बाजूला मरण हे जनतेचेच आहे’, असंही अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलं आहे.

Protected Content