अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय परिपत्राकानुसार ग्रामपंचायत कार्यालयात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देणे अनिवार्य असताना चौबारीचे ग्रामसेवक व सरपंच यांनी कसलीही तसदी घेतली नाही व शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत महामानवाचा अपमान केला. कर्तव्यात कसूर केल्यामुळे दोघांवर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन व्हॉईस ऑफ मीडियातर्फे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना देण्यात आले.
शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्र पुरुष व थोरव्यक्ती यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करणे अनिवार्य आहे. मात्र १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना चौबारी ग्रामपंचायतीत ना ग्रामसेवक नितिन मराठे आले ना सरपंच उषाबाई भिल ह्या आल्या. अर्थात त्या दिवशी महामानवाचा विसर पाडत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्याची तसदीही घेतली नाही.
ग्रामसेवक व सरपंच यांनी एकप्रकारे महामानवाचा अपमान करत शासकीय परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे ग्रामसेवक नितिन मराठे व सरपंच उषाबाई प्रकाश भिल यांच्यावर कारवाई का होऊ नये, अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना व्हॉईस ऑफ मीडियातर्फे तालुकाध्यक्ष अजय भामरे, सचिव जितेंद्र पाटील व कोषाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिले.
कोट –
आपण दिलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करुन संबंधितांना नोटीसा पाठविल्या जातील, तसेच तक्रारीत तथ्य आढळल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करुन कारवाईची प्रक्रिया केली जाईल.
-विशाल शिंदे, गटविकास अधिकार, पंचायत समिती, अमळनेर