नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाचा फायदा दोन कोटींपर्यंतचं कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना मिळणार आहे.
दोन कोटींचं कर्ज असणारे कर्जदार ज्यांनी मार्च ते ऑगस्ट असे सहा महिने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती त्यांची चक्रव्याढ व्याज रक्कम परत केली जाणार आहे. .
१४ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना सरकारला लवकर पावलं उचलण्याचा आदेश दिला होता. अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचा फायदा लघू, लघू व मध्यम, शैक्षणिक, गृह, क्रेडिट कार्ड, ऑटोमोबाइल, वैयक्तिक, व्यवसायिक कर्जदारांना होणार आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत कर्जदाराची थकबाकी दोन कोटींच्या पुढे असता कामा नये. माफ करण्यात आलेली चक्रव्याढ व्याज रक्कम बँकांकडून खातेदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
ही रक्कम ५ नोव्हेंबरला किंवा त्याच्या आधी कर्जदाराच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. यानंतर बँका १२ डिसेंबपर्यंत सरकारकडे परतफेडीसाठी दावा करु शकतात. या निर्णयामुळे केंद्राला ६५०० कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे