बँकिंग क्षेत्राचा विरोध ; वसुली सुरू करणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था – कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी देण्यात आलेली कर्ज हप्ते स्थगिती सुविधा आजपासून संपुष्टात येत आहे. ही सुविधा संपुष्टात आल्यास कर्जदारांना सप्टेंबरपासून कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यापासून तीन महिने कर्जहप्ते स्थगितीची सुविधा दिली होती. ही सुविधा १ मार्च ते ३१ मेपर्यंत लागू करण्यात आली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ३१ ऑगस्टपर्यंत आणखी तीन महिने मुदत वाढवली. सहा महिने कर्जहप्ते स्थगितीची सुविधा देण्यात आली.
एचडीएफसी लिमिटेडचे चेअरमन दीपक पारेख, कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांच्यासह अन्य बँकांच्या प्रमुखांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कर्जहप्ते स्थगितीचा कालावधी न वाढविण्याची विनंती केली होती. बँकांच्या मते काही ग्राहकांकडून या योजनेचा गैरफायदा करून घेतला जात आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा योजना राबवून काहीही उपयोग होणार नाही, असं बँकांचे मत आहे.
कर्जदारांना भेडसावणार्या समस्या दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वनटाइम लोन रिस्ट्रक्चरिंग योजना सादर केली आहे. बँकेच्या मते त्याअंतर्गत कॉर्पोरेट घराण्यांच्या व्यतिरिक्त सामान्य ग्राहकांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, समभाग खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज, ग्राहकोपयोगी वस्तू घेण्यासाठी घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्ड कर्ज, वाहन कर्ज, सोने, दागिने, वैयक्तिक कर्ज अथवा अन्य कामांसाठी घेण्यात येणार्या कर्जांसाठी या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.
सुप्रीम कोर्टाने रिझर्व्ह बँकेची कर्जहप्ते स्थगिती योजना डिसेंबरपर्यंत वाढविण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी १ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून समाप्त करण्यात येणार्या कर्ज हप्ते स्थगितीची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे..