न्यायालयाचा अवमान : प्रशांत भूषण यांना एक रूपयांचा दंड !

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाच्या कारभाराबद्दल टिपण्णी करून सरन्यायाधिशांबाबत ट्विटद्वारे शेरेबाजी केल्याच्या आरोपातून ज्येष्ठ विधीज्ज्ञ प्रशांत भूषण यांना आज न्यायालयाने एक रूपयांचा दंड ठोठावला आहे. तर दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १ रुपयाचा दंड ठोठावला आहे. प्रशांत भूषण यांनी हा दंड १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरुंगावास आणि तीन वर्षांपर्यंत न्यायालयात वकिली करण्यावर बंदी घालण्यात येईल असे कोर्टान म्हटले आहे.

प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला प्रसिद्धी दिल्यानंतर कोर्टाने दखल घेतली, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वातील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने म्हटले आहे. भूषण यांनी उचललेले पाऊल चुकीचे असल्याचे कोर्टाने निकालात म्हटले आहे.

२५ ऑगस्टला सुनावणीदरम्यान माफी मागण्यात गैर काय आहे, काय हा शब्द इतका वाईट आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. मी माझ्या ट्विटवर ठाम असून, त्यासाठी मी माफी मागणार नाही, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले होते. प्रशांत भूषण यांनी आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करावा आणि माफी मागावी असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. प्रशांत भूषण यांनी चोरी किंवा खून केलेला नाही, हे लक्षात घेता त्यांना शहीद बनवू नये, असे भूषण यांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी म्हटले होते.

या पू्र्वी कोर्टाने २५ ऑगस्टला त्यांना ठोठवायच्या शिक्षेबाबत आपला निर्णय राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा ठोठावण्याच्या मुद्द्यावर कोर्टाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा सल्ला मागितला होता. त्यावर प्रशांत भूषण यांना समज देऊन सोडून दिले पाहिजे, असे वेणुगोपाळ यांनी म्हटले होते.

प्रशांत भूषण यांनी न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता. ट्विट करत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जास्तीतजास्त सहा महिन्यापर्यंतची कैद किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा दिली जाऊ शकते.

Protected Content