कंपनीची ३३ लाखांत फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सीएमएस कंपनीच्या जळगावच्या शाखा मॅनेजरने कंपनीच्या खात्यात रक्कम न भरता तब्बल ३३ लाख २९ हजार १८१ रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रिंगरोडवर नाशिक येथील सीएमएस नावाची कंपनीची शाखा आहे. या शाखेत २०१८ मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून महेंद्र पांडूरंग झोंबाडे (वय-३४) रा. चाकण आगरवाड, पुणे हा काम पाहत होता. जळगाव शाखेचे कामकाज झोंबाडे कामकाज पाहत होता. कंपनीचे पुण्यातील वरीष्ठ व्यवस्थापक मुकुंद ओव्हळ हे सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीचे खात्याची तपासणी करत असतांना त्यांना रेल्वेकडील येणाऱ्या रकमेपैकी ३३ लाख २९ हजार १८१ रूपये खात्या आले नाही. याबाबत महेंद्र झोंबाडे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कंपनीचे अधिकारी यांनी जळगावला आल्यानंतर महेंद्र झोंबाडे यांनी अपहार केल्याचे कबुली देवून लवकर सर्व पैसे परत असल्याचे आश्वासन देवून १०० रूपयांचे स्टॅम्प पेपर आणि नोटरी देखील करून दिली. तरीही पैसे दिले नसल्याने याबाबत ६ फेबुवारी २०२० रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी  महेंद्र पांडूरंग झोंबाडे याच्या विरोधात अपहार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी  महेंद्र पांडूरंग झोंबाडे  हा फरार झाला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पो.कॉ. गणेश निकम, पोहेकॉ फिरोज तडवी यांनी संशयित  महेंद्र पांडूरंग झोंबाडे याला तब्बल अडीच वर्षानंतर पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

 

Protected Content