ओवेसी यांची ममतांवर टीका

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपलं गोत्र शांडिल्य असल्याचं सांगितलं. त्यावर   खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला . मी शांडिल्यही नाही आणि जानवंही घालत नाही, मग मी काय करु? असा सवाल ओवेसी यांनी विचारलाय.

 

“अशा लोकांनी काय करावं, जे शांडिल्य नाहीत किंवा जानवंही घालत नाहीत. जो कुण्या ठराविक देवाचा भक्त नाही. ना चालीसाचं पठण करतो. प्रत्येक पत्र जिंकण्यासाठी हिंदू कार्ड खेळतो आहे. हे अनैतिक, अपमानकारक आहे. तसंच या प्रयत्न यशस्वी होणार नाही”, असं ट्वीट करत ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

प्रचारच्या दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात बोलताना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदू कार्ड बाहेर काढलं. “मी मंदिरात गेले होते. तेव्हा पुजाऱ्यांनी विचारलं की तुमचं गोत्र काय? मला आठवलं की त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझं गोत्र मां, माटी, मानुष सांगितलं होतं. पण आज जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितलं की माझं गोत्र शांडिल्य आहे. पण मी मानते की माझं गोत्र मां, माटी, मानुष आहे”.

 

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केलीय. रोहिंग्यांना मतांसाठी वसवणारे, दुर्गा/काली पूजा रोखणारे, हिंदूना अपमानित करणारे, आता पराभवाच्या भीतीने गोत्र सांगत सुटले आहेत. शांडिल्य गोत्र सनातन आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, मतांसाठी नाही, अशा शब्दात गिरिराज यांनी ममतांवर निशाणा साधलाय.

Protected Content