माजी आमदार तात्यासाहेब आर.ओ. पाटील अनंतात विलीन ( व्हिडीओ )

m 1

 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील शिवसेनेचे माजी आमदार आणि निर्मल सीड्स कंपनीचे संस्थापक आर.ओ. पाटील यांचे मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आज पहाटे ४.३० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आर.ओ. पाटील हे शिवसेनेचे जळगाव लोकसभा क्षेत्र सहसंपर्कप्रमुख होते, मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५.०० वाजता भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनी येथून निघाली असून कॉलेजमार्गे स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड या मार्गाने अंत्ययात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला येऊन आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेत आहेत. अंत्ययात्रेत त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालुक्यातील मूळचे अंतुर्ली येथील रहिवासी असलेले आर. ओ. पाटील यांनी नव्वदच्या दशकात मेहनतीच्या जोरावर व्यवसायात उडी घेऊन निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. महाराष्ट्रासह विविध राज्यात आज तिच्या अनेक  शाखा आहेत. फेब्रुवारीमध्ये अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे ४.३० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्ह्यात आर.ओ. पाटील यांच्या जळगाव लोकसभेसाठी  उमेदवारीच्या प्रचाराचा शुभारंभ १५ फेब्रुवारी २०१९ रोजीच  पाचोरा येथे होणार होता.  कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली होती. याचवेळी त्यांच्या जीवनावर आधारित व्यवस्थापक सुरेश पाटील यांच्या संकल्पनेतुन  साकारलेल्या ‘क्रिएटिव लीडर – तात्यासाहेब आर. ओ. पाटील’ या पुस्तकाचे प्रकाशनही  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र मध्येच काळाने घात केल्याने त्यांचे खासदारकीचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 

 

 

Add Comment

Protected Content