पारनेरचे पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले !

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीत नाराजीनाट्याला कारणीभूत ठरलेले पारनेर नगर पंचायतीतील पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. या नगरसेवकांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद झाले होते.

 

पारनेर येथील शिवसेनेच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आज मुंबईत महत्त्वूपर्ण घडामोडी घडल्या. या पाचही नगरसेवकांना मुंबईत बोलावण्यात आले होते. सर्वप्रथम तेथे अजित पवार आणि नंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगण्यात आले. राज्यात खांद्याला खांदा लावून सरकार चालवणाऱ्या पक्षांमध्ये सरकार स्थापनेनंतर पहिल्या वर्षातच रंगलेला हा फोडाफोडीचा खेळ चर्चेचा विषय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घडामोडींमुळं कमालीचे नाराज झाले होते. आमचे फोडलेले नगरसेवक परत करा, असा निरोप ठाकरे यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर आज या पाचही नगरसेवकांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. मंत्रालयात अजित पवार, मिलिंद नार्वेकर नीलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर पाठविण्यात आले. मातोश्रीवर पाच नगरसेवकांनी आपली बाजू मांडली असून नाराजीचे कारण स्पष्ट केले आहे. सर्वांची समजूत काढण्यात आली आहे.

Protected Content